नवी दिल्ली : भारताची महान अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज व भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने बुधवारी क्रीडा मंत्रालयावर टीका केली. राष्ट्रीय अजिंक्यपदच्या आयोजनासाठी क्रीडा मंत्रालयाने परवानगी नाकारली, कारण विविध शहरांतील स्टेडियममध्ये इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.अंजू विश्व अजिंक्यपदमध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय ट्रॅक आणि फिल्ड अॅथलिट आहे. ती म्हणाली की, ‘नवी दिल्ली, बंगळुरू व चेन्नईमध्ये अॅथलिट जे स्टेडियम सरावासाठी वापरत होते, ते त्यांच्याकडून हिसकावण्यात आले आहेत.’पटियालामध्ये ५ ते ८ मार्चपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रन एडम फेडरेशन कप राष्ट्रीय सिनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची घोषणा केल्यानंतर अंजूने खंत व्यक्त केली. ती म्हणाली, ‘फुटबॉलने प्रत्येक ठिकाणी अॅथलेटिक्स मैदानांवर ताबा घेतल्याने अॅथलिटला सरावासाठी मैदानच राहिलेले नाही. दिल्लीचे नेहरू स्टेडियम, बंगळुरूचे कांतिविरा स्टेडियम, चेन्नईचे नेहरू स्टेडियम येथे सराव करू शकत नाही, कारण तेथे आयएसएल सुरू आहे. या ठिकाणी ट्रॅक चांगले आहे. मात्र सरावालाच परवानगी नाही हे दु:खद आहे.एएफआयचे सचिव सीके वाल्सन म्हणाले की, ‘महासंघाला ही स्पर्धा नवी दिल्लीत घ्यायची होती. मात्र आयएसएलमुळे हे स्टेडियम उपलब्ध होऊ शकले नाही.’
अंजू आणि एएफआयची क्रीडा मंत्रालयावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:53 AM