नवी दिल्ली : लांब उडीच्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकीक वाढवणारी भारताची अव्वल अॅथलिट अंजू बॉबी जॉर्जला २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिक स्पधेर्साठी रौप्यपदक मिळू शकते. अथेन्समध्ये लांब उडीमधील महिला गटातील पदक विजेत्यांची चौकशी केली तर, अंजूच्या नावावर आॅलिम्पिक रौप्यपदकाची नोंद होऊ शकते. २००३ साली पॅरिस येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंजूने कांस्यपदक मिळवल्यानंतर अथेन्स आॅलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला अॅथलिट आहे. अथेन्समध्ये लांब उडीच्या अंतिम फेरीत अंजूला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आॅस्ट्रेलियाची ब्रॉनवायन थॉम्पसनला चौथे तर, जाडे जॉन्सनला सहावे स्थान मिळाले होते. या स्पर्धेत अंजूने ६.८३ मीटर एवढी लांब उडी मारत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. जो अजूनही कायम आहे. अथेन्समध्ये लांब उडीमध्ये रशियन महिला अॅथलिटसनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकावर नाव कोरले होते. तातयाना लीबीडेवा, इरीना सीमाजीना आणि तातयाना कोटोवा या लांब उडीतील पदक विजेत्या तिन्ही अॅथलिटसनंतर डोप चाचणीत पकडल्या गेल्या. अथेन्समध्ये सुवर्णपदक मिळवणा-या लीबीडेवाचा उत्तेजक चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर २००८ बिजींग आॅलिम्पिकमध्ये तीने जिंकलेली दोन रौप्यपदके तिच्याकडून काढून घेण्यात आली. इरीना डोप चाचणीत सापडल्याने २०१२ मध्ये तिच्यावर दोनवर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे तिला लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. कोटोव्हाचे नमुने सुद्धा २०१३ मध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्याकडून २००५ वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील पदक काढून घेण्यात आले. (आॅनलाइन लोकमत)
...तर २००४ अथेन्स आॅलिम्पिकसाठी अंजू बॉबी जॉर्जला मिळेल रौप्यपदक
By admin | Published: March 30, 2017 1:21 AM