Anju Bobby George: भारताचा गोल्डन बॉय, म्हणजेच नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी (27 ऑगस्ट) नीरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. नीरजने 88.17 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. पाकिस्तानचा अर्शद नदीम दुसरा आणि जेकोब वडलेच (चेक प्रजासत्ताक) तिसरा आला.
नीरज चोप्रा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. अमेरिकेतील युजीन येथे झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेत नीरजने रौप्यपदक जिंकले होते. नीरज व्यतिरिक्त लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज ही जागतिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकू शकली आहे. अंजू बॉबी जॉर्जने 2003 पॅरिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या लांब उडी स्पर्धेत 6.70 मीटरची उडी मारुन कांस्यपदक जिंकले होते. तिच्यानंतर 19 वर्षांनंतर नीरज चोप्राने भारतासाठी पदकाचा दुष्काळ संपवला.
अडचणींनी भरलेला होता अंजूचा प्रवास अंजू बॉबी जॉर्जला तिच्या सरावाच्या दिवसांमध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका किडनीच्या बळावर अंजूने यश संपादन केले होते. विशेष म्हणजे, तिला पेन किलर औषधांचीही अॅलर्जी होती. असे असूनही तिने हिंमत सोडली नाही. अंजूने काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या प्रकृतीची माहिती दिली होती.
अंजूने ट्विट केले होते की, 'विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे, जिने एका किडनीच्या मदतीने सर्वोच्च स्तर गाठले. मला पेन किलर औषधांची ऍलर्जी होती, शर्यतीच्या सुरुवातीला माझा पुढचा पाय बरोबर काम करत नव्हता. अशा परिस्थितीत मी यश मिळवले. याला आपण प्रशिक्षकाची जादू म्हणू शकतो की त्याच्या प्रतिभेची.'
कोण आहे अंजू बॉबी जॉर्जकेरळमधील कोट्टायम येथे जन्मलेल्या अंजू बॉबी जॉर्जने 1996 मध्ये दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर 1999 मध्ये अंजूने नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्समध्ये रौप्यपदकाचा राष्ट्रीय विक्रम केला. 2003 च्या आफ्रो-एशियन गेम्समध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते. अंजूने IAAF वर्ल्ड अॅथलेटिक्स फायनल्स (मोनॅको 2005) मध्येही सुवर्णपदक जिंकले. 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंजूने तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या रॉबर्ट बॉबी जॉर्जसोबत लग्न केले आहे.