तिरुवनंतपुरम : विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची एकमेव महिला अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बुधवारी राजीनामा दिला. अंजू बॉबी जॉर्जने येथे एका पत्रकार परिषदेत केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तिच्याबरोबरच परिषदेतील १३ सदस्यांनीही राजीनामा दिला. केरळचे क्रीडामंत्री ई. पी. जयराजन यांचा अपमान केल्याचा आरोप अंजूवर आहे. त्याचप्रमाणे जयराजन यांनी अंजूवर अध्यक्षपदाच्या रूपात आर्थिक गैरव्यवहार करण्याचा कथित आरोप केला. याविषयी अंजूने म्हटले, ‘खेळ एखादी पार्टी अथवा राजकीय व्याप्तीच्या बाहेर आहे. मला क्रीडा परिषदेचा अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली होती, याचा मला आनंद होता; परंतु दुर्दैवाने जे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.’ अंजूने ते खेळाला मारू शकतात; परंतु खेळाडूंना हरवू शकत नसल्याचे म्हटले.अंजूला ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील याआधीच्या यूडीएफ सरकारने क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. क्रीडा परिषदेच्या अन्य सदस्यांत भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, व्हॉलीबॉलपटू टॉम जोसेफ आणि अॅथलिट प्रीजा श्रीधरन यांचा समावेश आहे.जयराजन यांच्या आरोपानंतर भारतीय अॅथलेटिक्स महासंघ आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनादेखील अंजू जॉर्जच्या बचावासाठी पुढे आले होते.आॅलिम्पिक संघटना आणि अॅथलेटिक्स महासंघाने अंजूविरुद्ध असे आरोप लावणे अनावश्यक आणि दु:खद असल्याचे म्हटले होते. आयओएने मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना ते अंजू बॉबीचे समर्थन करून त्यांना मदत करण्याची विनंती केली होती.(वृत्तसंस्था)
अंजू बॉबी जॉर्जने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा
By admin | Published: June 23, 2016 1:50 AM