अकापुल्को : भारताचा नेमबाज अंकुर मित्तल याने विश्वचषक शॉटगन नेमबाजीत दिमाखात तिरंगा फडकवताना सुवर्ण पदकाचा वेध घेतला. विशेष म्हणजे, यावेळी मित्तलने अंतिम फेरीत विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. त्याने आॅस्टे्रलियाचा प्रतिस्पर्धी जेम्स विलेटला धक्का देत बाजी मारली.गुरुवारी झालेल्या सहा खेळाडूंच्या अंतिम फेरीत अंकुरने ८० पैकी सर्वाधिक ७५ गुणांसह भारताला स्पर्धेत पहिले पदक जिंकून दिले. दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या विलेटला ७३ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंकुरने अंतिम फेरीत दिवसभर शानदार खेळ केला. पात्रता फेरीतही त्याने चमकदार खेळ करताना संभाव्य १५० पैकी १३८ गुणांची कमाई करीत दुसरे स्थान मिळवले होते. तसेच, चीनच्या यिंग क्वी याला शूट आॅफमध्येही अंकुरने ६-५ असा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. पात्रता फेरीत अंकुर आणि क्वी यांनी बरोबरी साधली होती. परंतु, शूट आॅफमध्ये अंकुरने जबरदस्त एकाग्रता दाखवत बाजी मारली. अंतिम फेरीत विजयी होण्यासाठी ८० अचूक निशाने साधणे आवश्यक होते. यावेळी अंकुरचे केवळ ५ वेध अपयशी ठरले. तसेच, आपल्या अखेरच्या ४० प्रयत्नांमध्ये तो केवळ २ वेळाच चुकला. त्यातला एक जरी निशाणा अचूक लागला असता, तर अंकुरला विश्वविक्रम मोडता आला असता. त्याचवेळी, नवी दिल्लीतील स्पर्धेत अंकुरला नमवलेल्या विलेटने ७ वेध अचूक साधले. चीनच्या क्वी याने ५२ गुणांसह कांस्य पदकावर नाव कोरले. दरम्यान, या स्पर्धेत अद्याप पुरुष व महिला स्कीट नेमबाजी होणे बाकी आहे. या आठवड्यांच्या अखेरीस या स्पर्धा होतील. महिला स्कीटमध्ये रश्मी राठोडच्या रुपाने भारताचे एकमेव आव्हान असेल. तसेच, पुरुष विभागांमध्ये अंगद वीर सिंग बाजवा, मान सिंग आणि अमरिंदर सिंग चीमा यांच्यावर भारताची मदार असेल. (वृत्तसंस्था)
अंकुर मित्तलचा ‘सुवर्ण’वेध
By admin | Published: March 23, 2017 11:38 PM