ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकापदासाठी सुरु असलेला शोध लवकरच संपणार आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची आज संध्याकाळी घोषणा होईल असे एएनआयने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. अनुराग ठाकूर सध्या धरमशाळा येथे आहेत.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण या सल्लागार समितीकडे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री आणि माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली होती.
शास्त्रींच्या तुलनेत अनिल कुंबळेचे पारडे जड आहे. मागच्यावर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेपासून भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय खेळत आहे. या दरम्यान रवी शास्त्री यांच्याकडे संघाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते संघाला मार्गदर्शन करत होते. टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांचा करार संपला आहे. एक जूनला बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी जाहीरात दिली होता. प्रशिक्षकपदासाठी एकूण ५७ अर्ज आले होते.