कुस्तीपटू विनेश फोगाटला ऐन फायनलपूर्वीच अपात्र ठरवत गोल्ड मेडलच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यानंतर भारताला आता आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा टोकियो 2020 पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत याला १८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे प्रमोद पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकला मुकणार आहे.
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने प्रमोदचे निलंबन केले आहे. प्रमोदने १२ महिन्यांत तीनवेळा डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे 1 मार्च 2024 रोजी उघड झाले होते. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्टच्या निर्णयाला प्रमोदने आव्हान दिले होते. 29 जुलैला प्रमोदचे अपिल फेटाळण्यात आले. तसेच 1 मार्च 2024 च्या CAS अँटी-डोपिंग विभागाच्या निर्णय कायम ठेवण्यात आला.
प्रमोद भगतनं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत त्यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर 21-14 21-17 असा विजय मिळविला होता.
कोण आहे प्रमोद भगत?बिहार येथील वैशाली गावातला त्याचा जन्म. पाच वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाची वाढ खुंटली. १३ वर्षांचा असताना तो एकदा बॅडमिंटन सामना पाहायला गेला अन् त्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो ओडिसा येथे स्थायिक झाला. पुढील दोन वर्ष त्यानं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. १५ वर्षांचा असताना त्यानं पहिली स्पर्धा खेळली आणि प्रेक्षकांचा पाठींबा पाहून त्याला आणखी प्रेरणा मिळाली.