कल्याण : बारवी आणि आंध्र धरणांतील घसरणाऱ्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. सलग ३० तास कपात केल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने केडीएमसीने मंगळवारी कपात सुरूच ठेवताना महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गोविंद बोडके यांच्या मान्यतेनंतर ही अंमलबजावणी जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे.
धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने २१ आॅक्टोबरपासून २२ टक्केपाणीकपात लागू केली होती. परंतु, धरणातून सर्वच प्राधिकरणांकडून वारेमाप पाणी उचलले जात असल्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय लघुपाटबंधारे विभागाने घेतला आहे. केडीएमसीकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी, तर एमआयडीसीकडून पुरवले जाणारे पाणी शुक्रवारी २४ तास बंद असते. आता लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ही कपात आता सहा तासांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना ३० तासांच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असतो. जर ३० तास सलग कपात लागू केली, तर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आणखीन एक दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सलग ३० तास कपात न करता त्यातील २४ तासांव्यतिरिक्त उर्वरित सहा तासांचे चार आठवडे मिळून एक पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतिरिक्त दिवस महिन्यातील शेवटचा शनिवार राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली. आयुक्तांना यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला असून त्यांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.एमआयडीसीची सलग पाणीकपात?नागरिकांना सलग ३० तासांच्या पाणीकपातीची झळ बसू नये, म्हणून केडीएमसीने महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी मात्र सलग ३० तासांची पाणीकपात लागू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाºया २७ गावांना पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.उद्या पाणी नाहीया आठवड्यात मंगळवारी शटडाउन घेण्यात आले नव्हते. त्याऐवजी, केडीएमसीतर्फे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या शनिवारी पाणीकपात न करता जानेवारीपासून वाढीव कपात सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.