ऑनलाइन लोकमत
पहिल्या आॅलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या सिंधूने आपल्या उंचीचा फायदा घेत पहिल्या पॉर्इंटपासूनच खेळावर नियंत्रण मिळविले. पहिल्या सेटमध्ये तिने एकदाही जपानी खेळाडूला वरचढ होऊ दिले नाही. आॅल इंग्लंड चॅम्पियन ओकुहारा सरासरी तीन पॉर्इंटने मागे राहील याची सिंधूने दक्षता घेतली होती. सिंधूचे जोरदार स्मॅश परतविण्याच्या प्रयत्नात ओकुहारा पहिल्या गेममध्ये दोनवेळा कोर्टवर घसरून पडली. चांगली आघाडी घेतली असताना पहिला गेम संपता-संपता ओकुहाराने सिंधूशी १८-१८ अशी बरोबरी साधली; पण येथून सिंधूने चपळाई दाखविताना २१-१९ अशी सरशी साधली.
दुसऱ्या गेममध्ये मात्र दोघींनी अटीतटीचा खेळ केला. दोघीही एकमेकींच्या गुणांचा पाठलाग करीत होत्या. १0 पॉर्इंटपर्यंत दोघींमध्ये जास्त अंतर नव्हते; पण १0-१0 अशी बरोबरी असताना सिंधूने सलगपणे ११ पॉर्इंट मिळवीत ओकुहाराचे आव्हान २१-१0 असे मोडीत काढले.
सामना जिंकल्यानंतर सिंधूने जल्लोष केला. तिने एकाच दिवशी भारतीय चाहत्यांना दुहेरी आनंदाची संधी दिली आहे. १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारताला साक्षी मलिकने कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवून दिले होते. त्यानंतर २0 तासांनी सिंधूने आणखी एका पदकाची देशासाठी निश्चिती केली आहे. अंतिम फेरी गाठल्यामुळे सिंधूचे सुवर्ण किंवा रौप्यपदक निश्चित झाले आहे, तिची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. बॅडमिंटनमध्ये लंडन २0१२ च्या आॅलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक मिळविले होते. सिंधूची कामगिरी त्याहून सरस ठरणार आहे.