नवी दिल्ली : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटनं दुखापतीच्या कारणास्तव आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. अशातच २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघालनं पदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच विनेश फोगाटपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तिनं सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी विनेशला थेट प्रवेश देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी पंघालची याचिका फेटाळण्यात आली. अखेर गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेशने आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अंतिम पंघालला तिची अनुभवी जोडीदार विनेश, जी आशियाई खेळांची चॅम्पियन आहे आणि अनेक आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती आहे, हिच्या कामगिरीबद्दल चांगलीच माहिती आहे.
खरं तर विनेश फोगाट ही एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे, जिने दोन जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत. रिओ (२०१६) आणि टोकियो (२०२१) या दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये विनेशचा सहभाग असला तरी तिला पदक जिंकण्यात अपयश आलं होतं. आगामी स्पर्धेबद्दल बोलताना अंतिम पंघाल म्हणाली की, विनेश खूप चांगली कुस्तीपटू आहे, तिने राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक स्पर्धेत पदकं जिंकली आहेत. पण, मी तिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. तिच्यापेक्षा जास्त मेहनत करून तिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.
अंतिम पंघालनं फुंकलं रणशिंग "माझा सराव चांगला चालला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मी बराच काळ सराव करत आहे", असं पंघालनं सरावाबद्दल सांगितलं. पंघालने मागील आठवड्यात जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटाचे विजेतेपद राखले. पंघाल आणि विनेश या दोघी ५३ किलो वजनी गटात कुस्ती खेळतात. पण, पंघालने चाचण्या पास केल्या अन् विनेशची आपोआप आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आणि दोघांमधील आखाड्याबाहेरील कुस्ती सुरू झाली.
आगामी मोठ्या स्पर्धेत सर्वच देशांचे कुस्तीपटू खूप मजबूत असतील. ही माझी पहिली आशियाई स्पर्धा आहे, त्यामुळे मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेत आहे, मानसिकदृष्ट्या शांत राहण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मी फक्त 'रिलॅक्स' होण्याचा प्रयत्न करते, असं अंतिम पंघालनं स्पष्ट केलं.