पॅरिस : यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २०१६चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा बहुमान देण्यात आला.२५ वर्षीय सडपातळ अंगकाठीच्या ग्रिझमनने या स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल केले, तर २ गोलमध्ये सहायकाची भूमिका पार पाडली. फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यात तो अपयशी ठरला असला, तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात त्याने मोठा वाटा उचलला. जर्मनीविरुद्ध त्याने २-० असा विजय मिळवताना दोन्ही गोल केले होते. तत्पूर्वी, त्याने आयर्लंडविरुद्ध राउंड १६च्या सामन्यात २ गोल नोंदवून संघाला २-१ ने विजय मिळवून दिला होता. ग्र्रिझमन १९८४नंतर पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने युरो स्पर्धेत ६ गोल केले आहेत. या स्पर्धेत मायकेल प्लाटिनीने ९ गोल केले होते. त्याच्यानंतर ग्रिझमनचा क्रमांक लागतो. युफाने सेमीफायनलपर्यंत पोहोचणाऱ्या ४ संघांतून ११ जणांचा संघ निवडला. यात विजेत्या पोर्तुगालच्या ४, फ्रान्सच्या २, जर्मनीच्या ३ आणि वेल्सच्या २ खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यात समावेश असला, तरी वेल्सचा कर्णधार गेरॉथ बॅलेचा मात्र समावेश नाही.निवडण्यात आलेले खेळाडूगोलकीपर : रुई पॅट्रिशियो (पोर्तुगाल), डिफेंडर : जोशुआ किमीच (जर्मनी), जेरॉम बोएटेंग (जर्मनी), पेपे (पोर्तुगाल), राफेल गुएरिरो (पोर्तुगाल), मिडफिल्डर : टोनी क्रूस (जर्मनी), जो अॅलेन (वेल्स), अँटोनी ग्रिझमन (फ्रान्स) अॅरेन रामी (वेल्स), दिमित्री पायेट (फ्रान्स) व फॉरवर्ड : ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल).
अँटोनी ग्रिझमन सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू
By admin | Published: July 13, 2016 3:08 AM