नवी दिल्ली : आॅलिम्पिक पदक विजेते मल्ल सुशील कुमार व योगेश्वर दत्त यांना घडविणारे प्रशिक्षक अनूपसिंग यांच्यासह पाच प्रशिक्षकांना यंदा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कुस्ती प्रशिक्षक अनूपसिंग यांच्या व्यतिरिक्त पॅरालिम्पिक प्रशिक्षक नवलसिंग, हरबन्ससिंग (अॅथलेटिक्स), स्वतंत्र राजसिंग (बॉक्सिंग) आणि निहार अमीन (जलतरण) यांची आपापल्या खेळामध्ये खेळाडू तयार करण्यासाठी आणि उल्लेखनीय योगदान देण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्करासाठी निवड करण्यात आली. क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी याला दुजोरा दिला. १९८५ पासून प्रशिक्षकांना (कोच) द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यासाठी प्रशिक्षकांनी तयार केलेले खेळाडू आणि संघाची कामगिरी विचारात घेण्यात येते. २००२ मध्ये प्रारंभ झालेला ध्यानचंद पुरस्कार क्रीडा क्षेत्रात लाईफ टाईम अॅचिव्हमेंटसाठी दिला जातो. खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी करणारे आणि निवृत्तीनंतरही क्रीडा विकासासाठी सक्रिय भूमिका बजाविणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.याव्यतिरिक्त वर्ष २००९ पासून राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रारंभ करण्यात आला. त्यात क्रीडा विकासासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील संस्था, तसेच बिगर सरकारी संघटनांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार चार विभागांत देण्यात येतो. त्यात यंदाच्या मोसमात नव्या व युवा प्रतिभेचा शोध घेत त्यांना विकासासाठी कार्य करण्यासाठी पहिल्या गटातील पुरस्कार, सैन्य प्रशिक्षण महासंचालनालय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कॉर्पोरेट विभागात सामाजिक जबाबदारी ओळखून खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना कोल इंडिया लिमिटेड पुरस्कार, खेळाडूंना रोजगार आणि क्रीडा कल्याण उपाययोजनेसाठी हरियाणा पोलीस पुरस्कार आणि विकासासाठी क्रीडा गटातील स्पोर्ट््स कोचिंग फाउंडेशन, हैदराबाद हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार प्रदान करणार आहेत. द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांना पुरस्कारादाखल छोटी प्रतिमा, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी पाच लाख रुपये रोख प्रदान करण्यात येतात. राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. (वृत्तसंस्था)तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारा आंतरराष्ट्रीय मल्ल अनूपने भारताचे अव्वल मल्ल व आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, योगेश्वर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला अनेक पदक मिळवून देणारे सत्यव्रत कादियान, बजरंग आणि अमित दहिया यांना प्रशिक्षण दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अन्य ५८ मल्लांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने समितीच्या शिफारसी आणि चौकशीनंतर अनुप व नवल यांची २०११ ते २०१४ या कालावधीतील कामगिरी विचारात घेऊन त्यांच्या नावावर सहमती दर्शवली. निहार, स्वतंत्रसिंग आणि हरबन्स यांची जीवनगौरव कॅटेगरीनुसार गेल्या २० वर्षांत त्यांनी खेळासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करता द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली.द्रोणाचार्य पुरस्काराव्यतिरिक्त यंदा ध्यानचंद पुरस्कारासाठी रोमियो जेम्स (हॉकी), शिवप्रकाश मिश्रा (टेनिस), टी. पी. पी. नायर (व्हॉलिबॉल) यांची निवड करण्यात आली.
अनूपसिंग, नवलसिंग यांची नावे निश्चित
By admin | Published: August 26, 2015 4:24 AM