ऑनलाइन लोमकत
नवी दिल्ली, दि. 13 - न्यायालयात शपथ घेऊन खोटी माहिती देणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. अनुराग ठाकूर यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करण्यात आला असून, न्यायालय उद्या त्यावर निर्णय घेणार आहे.
अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात स्पष्ट शब्दात बिनशर्त माफीनामा सादर करवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सात जुलै रोजी दिले होते. त्यानंतर आज ठाकूर यांच्याकडून माफीनामा सादर करण्यात आला. चुकीची माहिती आणि गैरसमजातून सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिली गेली. त्यासाठी मी कोणत्याही अटीविना माफी मागतो. मी न्यायालयाच्या प्रतिष्ठेला कधीच कमी समजलेले नाही, असे अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका पानाच्या माफीनाम्यामध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले होते. अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात शपथपत्र सादर करावे, ज्यात स्पष्ट शब्दात माफीनामा असेल. तसेच त्यांच्याकडून सादर करण्यात आलेले शपथपत्र न्यायालय स्वीकारणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला होता. अधिक वाचा
माफीनामा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई बंद करण्यात येईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर अनुराग ठाकूर यांचे वकील पी.एस. पटवालिया यांनी आपले अशिल बिनशर्त माफी मागण्यास तयार आहेत असे सांगितले. तसेच या खटल्यात आपली बाजू भक्कम होती. तसेच आमच्या अशिलाने काही चूक केली नसल्याचे आपण सिद्ध करू शकलो असतो, असेही ते म्हणाले.
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अनुराग ठाकूर यांनी नोंदवलेला जबाब खोटा असल्याचे मत न्यायलयाने नोंदवले होते. तसेच त्यासाठी ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभारात बदल सुचवण्यासाठी लोढा समितीची नियुक्ती केली होती.