ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : विलेपार्लेची राष्ट्रीय पदक विजेती अनुष्का पवारची आगामी जागतिक शालेय जिमनॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा ट्रॅबझोन (तुर्कस्थान) येथे ११ ते १८ जुलै दरम्यान पार पडणार आहे. तेलंगणा येथे नुकताच झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय जिमनॅस्टीक स्पर्धेतून देशभरातील स्पर्धकांमधून जागतिक शालेय स्पर्धेसाठी भारताच्या जिमनॅस्टीक संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धेत अनुष्काने थराराक कसरती करत उपस्थितांचे लक्ष वेधून भारतीय संघातील आपली जागा निश्चित केली.विलेपार्ले येथील प्रबोधनकार क्रीडा संकुलात प्रशिक्षक हरीश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असलेली अनुष्का अंधेरी येथील राजहंस विद्यालयात दहावीत शिकत आहे.