-अयाझ मेमन संपादकीय सल्लागारआयपीएलचे दहावे सत्र खेळविण्यात येत आहे आणि त्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण तरी यंदा काही प्रमुख खेळाडू दुखापत किंवा थकव्यामुळे अनुपलब्ध राहणार असल्याने स्पर्धेची चमक काहीशी कमी असेल. आयपीएलची उत्सुकता तशी दरवर्षी असते. कारण या स्पर्धेतून अनेक नवे स्टार्स निर्माण होतात. अनेक गुणवान खेळाडूंना आपली छाप पाडण्याची संधी मिळते. एकूणच या स्पर्धेत एक रोमांचक वातावरण तयार होते, ज्यामुळे प्रेक्षकांना रंगतदार क्रिकेटची मेजवानीच मिळते. त्याचबरोबर खेळाडूंनाही स्वत:ला सिध्द करण्याची संधी मिळत असते, ज्याद्वारे ते आपली कारकिर्द यशस्वी करत असतात. रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, डेव्हीड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ यासारखे अनेक आयपीएल प्रोडक्ट्स आज क्रिकेट स्टार्स बनले आहेत. तसेच, अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमक दाखवून आपले नाव कमावले आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले. त्यामुळे या सत्रातही असेच खेळाडू समोर येतील आणि त्यांच्या टॅलेंटची मजा चाखण्याची संधी आपल्याला मिळेल, हीच आशा आहे. भले मोठे खेळाडू जसे विराट कोहली, मिशेल स्टार्क, के. एल. राहुल, आश्विन खेळणार नसले, तरी माझे मत आहे की, ही स्पर्धा खूप यशस्वी होईल. आयपीएलला रोखणे आता अशक्य आहे.या वर्षीच्या आयपीएलमध्ये कोणता संघ मजबूत आहे, हे सांगणे खूप कठीण आहे. रॉयल चँलेंजर्स बंगलोरकडे पाहिले तर कोहली सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही, राहुल तर खेळणारच नाही, स्टार्क अजून भारतात आलेला नाही. यानंतरही त्यांच्याकडे खूप ताकद आहे. दक्षिण आफ्रिकन एबी डिव्हीलियर्स, वेस्ट इंडिजचा वादळी फलंदाज ख्रिस गेल, आॅष्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याव्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी, श्रीनाथ अरविंद, युझवेंद्र चहल, सर्फराज खान यांच्या समावेशाने हा संघ खूप मजबूत आहे. त्यानंतर कोलकाता नाइटरायडर्स खूप समतोल संघ आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, धडाकेबाज अष्टपैलू युसुफ पठाण, बांगलादेशचा अष्टपैलू साकिब-अल हसन हे खेळाडू निर्णायक आहेत. एक वर्षाची आंतरराष्ट्रीय बंदी आल्याने वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल यंदा त्यांच्या संघात नसेल, त्याच्या जागी न्यूझीलंडच्या कोलीन डी. ग्रँडहोमला केकेआरने करारबध्द केले आहे. केकेआर हा संघ मजबूत आहे, असे मानावे लागेल.दुसरीकडे डेव्हीड वॉर्नर हैदराबादचे नेतृत्व करीत आहे. त्याच्यासोबत युवराज सिंग आहे. तसेच अफगाणिस्तानचे दोन नवीन खेळाडू त्यांच्या चमूमध्ये आले आहेत. मला वाटते ही खूप रोमांचक प्रगती आहे. तसेच पुणे संघदेखील लक्षवेधी आहे. त्यांची धुरा स्टिव्ह स्मिथकडे आहे. त्याच्यासह धोनी, रहाणे, बेन स्टोक्स असे तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे कोणता संघ मजबूत आहे हे सांगणे खूप कठीण आहे.एका बाजूला दिल्ली आणि पंजाब थोडे कमजोर संघ वाटतात. पण स्पर्धेच्या पहिल्या सत्रावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, ज्या राजस्थान रॉयल्सला जेतेपदाचा दावेदार म्हणून कोणीही मानले नव्हते त्याच राजस्थानने पहिली स्पर्धा जिंकली होती. त्याचप्रमाणे, पहिल्या सत्रात अखेरच्या स्थानावर असलेल्या हैदराबादने पुढच्या सत्रात बाजी मारली होती. त्यामुळे आयपीएल किंवा टी२०मध्ये कधीही काहीही होऊ शकते.
टट्वेंटी-टट्वेंटीमध्ये कधीही, काहीही होऊ शकतं !
By admin | Published: April 04, 2017 12:10 AM