यंदाच्या सत्रात मँचेस्टर युनायटेडची कामगिरी लौकिकास साजेशी नसली तरी संघाचा स्टार मिडफिल्डर जुआन माटा याला आपल्या संघाच्या कामगिरीवर विश्वास आहे. एप्रिलपासून होणाऱ्या सामन्यांना माटा मुकणार असून आतापर्यंत त्याने संघाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले असून हे योगदान वाया जाणार नाही अशीच त्याला अपेक्षा आहे. त्यातही ज्या टीम मॅनेजरने आपल्या रणनितीबाहेर जात असल्याने माटाला चेल्सीकडून एमयूकडे पाठवले त्याच जोस मुरिन्हो यांची एमयूमध्ये एन्ट्री झाल्यानंतर माटाच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण माटाने आपण संघाचे महत्त्वाचे खेळाडू असल्याचे सिध्द केले. माटाने यंदाच्या सत्रात अव्वल १० गोल स्कोअरर खेळाडूंमध्ये स्थान पटकावले असून सलग तिसऱ्यांदा त्याने १० हून अधिक गोल नोंदवण्याची कामगिरी केली आहे. आता एमयू संघ पुढील सामन्यात एव्हर्टनविरुध्द भिडण्यास सज्ज असून यानिमित्ताने माटाशी केलेली खास बातचीत...सत्रात समाधानकारक कामगिरी न झाल्याने ‘एमयू’वर खूप टीका होत आहे. त्यामुळे नवी सुरुवात करणे तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे?- नक्कीच प्रत्येकाला जिंकायचे असते. मला वाटते काही सामन्यांपासून आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत. गेल्या अनेक सामन्यांपासून आम्ही अपराजित आहोत. पण एक संघ म्हणून कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची जाणीव आम्हाला आहे. हा अनेक ट्रॉफी जिंकणार आणि चॅम्पियन्स लीग खेळणारा संघ आहे. या विजयी कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा निर्धार आहे.तुझ्या अनुपस्थितीमध्ये खेळताना ‘एमयू’साठी एप्रिल महिना किती महत्त्वाचा आहे?- संघासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. कमी वेळेत खूप सामने खेळायचे आहेत आणि ही वेळ स्पर्धेत निर्णायक ठरु शकते, हे माहीत आहे. यासाठी आम्ही सज्ज आहोत. यंदाच्या सत्रात तू संघासाठी १० गोल केले आहेत आणि सलग तिसऱ्यांदा तू दुहेरी गोलसंख्या साधली आहेस. काय सांगशील?- मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. स्पर्धेत अजूनही काही सामने बाकी असताना ही गोलसंख्या गाठणे खूप आनंददायी आहे. तसेच, पुनरागमन केल्यानंतर या गोलसंख्येत आणखी भर घालण्याचा माझा प्रयत्न असेल. सलग तिसऱ्यांदा अशी कामगिरी केल्याचा अभिमान आहे. सर्व यश तुझे वैयक्तिक आहे का?- नाही. हे सांघिक यश आहे. मी माझ्या संघसहकाऱ्यांना गोल करण्यात, पासिंग देण्यात आणि आक्रमक खेळ करण्यात मदत करत असतो. संघानुसार कामगिरीत बदल करण्यावर माझा भर असतो. संघासाठी गोल करणे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे आणि हे संघसहाय्याशिवाय कदापि शक्य नाही.चेल्सीमध्ये जोस मुरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली तू इतरांपेक्षा वेगळा खेळाडू होतास असे वाटते का?- मला असे नाही वाटत. मी इतरांसारखाच स्वत:ला कायम समजतो. माझ्यातही काही उणीवा आहेत. मी नेहमी माझ्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी धडपडत असतो. पण, माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मी आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर कधीच खूश नसतो. त्याहून अधिक चांगली कामगिरी करण्याचे आव्हान मी स्वत:ला देत असतो. (पीएमजी)
एप्रिल महिना मँचेस्टर युनायटेडसाठी महत्त्वाचा
By admin | Published: April 04, 2017 12:43 AM