जकार्ता : तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले.मोनू घनघास याने पुरुषांच्या थाळीफेकीत (एफ११) रौप्य जिंकल्यानंतर मोहम्मद यासिर याला पुरुष गोळाफेक प्रकारात (एफ४६) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. हरविंदरने (डब्ल्यू २/एसटी) गटाच्या फायनलमध्ये चीनच्या खेळाडूला ६-० ने हरवून सुवर्ण जिंकताच भारताची सुवर्णांची संख्या सात झाली.डब्ल्यू २ गटात ज्यांचे शरीर अपंग असते किंवा ज्यांच्या गुडघ्याच्या खालचे दोन्ही पाय निकामी झालेले असतात, ज्यामुळे त्यांना उभे होता येत नाही आणि व्हीलचेअरची गरज भासते, अशा खेळाडूंचा समावेश होतो. एसटी गटाच्या तिरंदाजांमध्ये मर्यादित अपंगत्व असल्याने ते व्हीलचेरविना नेम साधू शकतात.ट्रॅक अॅन्ड फिल्डमध्ये मोनूने तिसऱ्या प्रयत्नांत ३५.८९ मीटर थाळीफेक करीत दुसरे स्थान मिळविले. इराणचा ओलाद माहदी ४२.३७ मीटरच्या नव्या विक्रमासह सुवर्णाचा मानकरी ठरला. गोळाफेकीत यासिरने १४.२२ मीटरसह कांस्य जिंकले. चीनचा वेई एनलोंग १५.६७ मीटरसह अव्वल स्थानी राहिला. कझाखस्तानच्या राविलला १४.६६ मीटरसह रौप्य मिळाले.टेबल टेनिस दुहेरीत टीटी-३-५ गटात भवानीबेन पटेल व सोनलबेन पटेल अंतिम फेरीत इंडोनेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांना रौप्यवर समाधान मानावे लागले.बुद्धिबळात भारताने एक रौप्य व दोन कांस्य पदके जिंकली. जेनिथा एंटोने महिलांच्या वैयक्तिक पी-१ गटात रौप्य जिंकल्यानंतर प्रेमा कनिश्रीसह सांघिक कांस्य जिंकले. याशिवाय मृणाली प्रकाश, मेघा चक्रवर्ती व तिजान पुनारम यांनीही बी-२- बी-३ प्रकारात कांस्य जिंकले. पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने ८० किलो गटात १९२ किलो वजन उचलून तिसरे स्थान घेतले. (वृत्तसंस्था)पदकतालिकेत भारत नवव्या स्थानीभारताने बुधवारी एकूण नऊ पदके जिंकली. आतापर्यंत सात सुवर्ण, १३ रौप्य आणि १७ कांस्यसह एकूण ३७ पदकांसह भारत पदक तालिकेत नवव्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर असलेल्या चीनने १०० सुवर्ण, ४७ रौप्य आणि ३९ कांस्य पदके जिंकली.
तिरंदाज हरविंदर सिंगचा सुवर्णवेध; मोनूला रौप्य, मोहम्मद यासिरला कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 2:31 AM