Asian Games 2023 Day 12 : आशियाई स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. आज भारताला आतापर्यंत तीन सुवर्ण पदक मिळाली आहेत. ओजस प्रवीण, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश समाधान या त्रिकूटाने तिरंदाजीच्या पुरुषांच्या कम्पाउंड प्रकारात भारताला दिवसातील तिसरे सुवर्ण पदक जिंकून दिले. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकूण ८४ पदके जिंकता आली असून यामध्ये २१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज १२ वा दिवस आहे. आजच्या दिवशी भारताला तीन सुवर्ण जिंकण्यात यश आले. स्क्वॅशमध्ये भारताच्या दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग यांनी मिश्र संघात सुवर्ण पदक पटकावले. याशिवाय ज्योती सुरेखा, अदिती गोपीचंद स्वामी आणि प्रनीत कौर या त्रिकुटाने तिरंदाजीच्या कम्पाउंड फेरीत सुवर्ण पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली.
दरम्यान, एकोणिसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत ८४ पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये २१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यंदाच्या पर्वात भारताने विक्रमी कामगिरी करताना आपली सार्वकालिक सर्वोत्तम कामगिरी मोडीत काढली. २०१८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि १६ सुवर्ण पदकांसह ७० पदके जिंकली होती.