बर्लिन : भारतीय महिला कम्पाउंड संघाला अंतिम फेरीचा अडथळा पार करण्यात पुन्हा एकदा अपयश आले आहे. तिरंदाजी विश्वचषकात चौथ्या आणि अंतिम फेरीत संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. फ्रान्सने एका गुणाच्या आघाडीने सुवर्णपदक पटकावले.विश्व चषक सर्किटमध्ये पहिल्या सुवर्णपदकाची आशा असलेल्या ज्योती सुरेखा वेनाम, मुस्कान किरार आणि तृषा देब यांनी ५९-५७ अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या सेटमध्ये त्या मागे पडल्या आणि फ्रान्सच्या संघाने २२९-२२८ असे गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले.सोफी डोडेमोंट, एमेली सेनसेनोट आणि सांड्रा हर्वे यांनी सलग पाचवेळा अचूक १० गुण मिळवले. त्यामुळे दुसºया सेटमध्ये त्यांनी ११६-११६ अशी बरोबरी मिळवली. तिसºया सेटमध्ये भारतीय संघावर दबाव वाढला. त्यांनी सहा आणि आठमध्ये पुन्हा खराब सुरुवात केली. मात्र फ्रान्सच्या खेळाडूंनी आपली लय कायम राखत १७४-१६९ असा स्कोअर केला.चौथ्या सेटमध्ये भारतीय संघाने ६० पैकी ५९ गुण मिळवले आणि फ्रान्सचा संघ एका गुणाच्या फरकाने विजयी झाला. विश्वचषकाच्या अंताल्या सत्रात भारतीय संघ (ज्योती, मुस्कान आणि दिव्या) चीनी तायपेकडून तीन गुणांनी पराभूत झाला होता. (वृत्तसंस्था)
तिरंदाजी विश्वचषक : भारतीय महिला संघाला रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:01 AM