हर्मोसिलो : भारताचा कंपाउंड प्रकारातील तिरंदाज प्रथमेश जावकर हा डेन्मार्कच्या माथियास फुलर्टन याच्याविरुद्ध शूटऑफमध्ये पराभूत झाल्यामुळे त्याला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रथमेश हा युवा तिरंदाज बुलढाण्याचा आहे.
शांघाय विश्वचषक विजेता जावकर जगातील अव्वल तिरंदाज आणि गतविजेता माइक श्लोसेर याला चार महिन्यांत दुसऱ्यांदा नमवून अंतिम फेरीत पोहोचला होता. विजेतेपदाच्या लढतीत तो फुलर्टन याच्याकडून १४८-१४८ (१०-१०*) असा पराभूत झाला. फुलर्टनला लक्ष्याच्या अधिक जवळ निशाणा लावण्यात यश आल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. जावकर तिसऱ्या फेरीनंतर ८९-९० असा पिछाडीवर होता. चौथ्या फेरीत त्याने ३०-३० अशी बरोबरी साधली आणि ११९ वर गुणांची बरोबरी केली. पाचव्या आणि अंतिम फेरीत दोन्ही तिरंदाजांनी समान २९ गुण मिळवले. टायब्रेकरमध्येही दोघांचे गुण समान होते. पण किरकोळ फरकामुळे जावकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रथमेशने उपांत्य फेरीत श्लोसेर याला १५०-१४९ असे पराभूत केले. श्लोसेरने कांस्यपदकाच्या लढतीत अनुभवी खेळाडू अभिषेक वर्मा याला १५०-१४९ असे पराभूत केले.
महिला खेळाडूंकडून निराशाभारतीय महिला कंपाउंड तिरंदाजांनी निराशा केली. भारताच्या अदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम दोघींनाही पहिल्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. ज्योतीला कोलंबियाच्या सारा लोपेझ हिने पाच गुणांच्या फरकाने पराभूत केले. सर्वांचे लक्ष जगज्जेत्या अदिती स्वामी हिच्यावर होते पण या १७ वर्षीय खेळाडूला दबावाचा सामना करण्यात अपयश आले. तिला डेन्मार्कच्या तंजा गेलेंथिएन हिच्याकडून शूटऑफमध्ये १४५-१४५ (९-१०) असा पराभव पत्करावा लागला.