भारताच्या तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक दिली आहे. तिरंदाजीच्या पुरुषांच्या वैयक्तिक गटामध्ये भारताच्या अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांनी त्यांच्या कोरियन प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता शनिवार ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी हे दोन्ही खेळाडू आमने-सामने येणार आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे ओजस देवतळे हा महाराष्ट्रातील नागपूरमधील असून, गेल्या काही काळात त्याने तिरंदाजीमध्ये मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांनी अंतिम फेरी गाठल्याने भारताचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीमधील पहिलं-वहिलं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आता दोन भारतीय क्रीडापटूंमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीत नेमकी बाजी कोण मारतं याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २४ कांस्यपदके जिंकली आहेत. य़ासह भारत पदकतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर १५० सुवर्ण, ८१ रौप्य आणि ४२ कांस्यपदकं अशा मिळून २७३ पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे.