रिओ दी जेनेरिओ : विश्वविजेत्या अर्जेंटिनाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझीलला त्यांच्याच देशात नमवून विश्वचषक पात्रता फेरी सामन्यात दमदार विजय मिळवला. प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या मकराना स्टेडियममध्ये आकर्षणाचा केंद्र ठरला तो लिओनेल मेस्सी. मेस्सीच्या कारकिर्दीत हा सामना ब्राझीलमधील शेवटचा सामना ठरणार होता. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली.
स्टेडियममध्ये गर्दी जरी मेस्सीसाठी झाली असली, तरी सामना गाजवला तो निकोलस ओटामेंडी याने. त्याने ६३व्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने शानदार विजय मिळवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात ओटामेंडीने निर्णायक आणि सामन्यातील एकमेव गोल करत अर्जेंटिनाला विजयी केले. ७८व्या मिनिटाला मेस्सीने मैदान सोडले. यावेळी प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मेस्सीला मानवंदना दिली. या स्पर्धेत ब्राझीलला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.सामन्याआधी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत धून वाजविण्यात आल्यानंतर ब्राझील आणि अर्जेंटिनाचे चाहते स्टेडियममध्येच एकमेकांशी भिडली. यावेळी मोठा गदारोळ उठल्याने सामना २७ मिनिटे उशीराने सुरु झाला.