जिंकली अर्जेंटिना अन् बाईक रॅली निघाली भारतात! मेस्सीच्या चाहत्यांना तोडच नाही; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:38 PM2021-07-11T16:38:36+5:302021-07-11T16:39:32+5:30
आंतरराष्ट्रीय फुलबॉल विश्वातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं काल कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत इतिहास रचला. त्याचे पडसाद भारतातही पाहायला मिळाले.
आंतरराष्ट्रीय फुलबॉल विश्वातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्याअर्जेंटिनानं काल कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत इतिहास रचला. अर्जेंटिनानं तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेटिंना संघानं ब्राझीलचा १-० ने पराभव केला. पण या विजयाचं सेलिब्रेशन फक्त अर्जेंटिनामध्येच नव्हे, तर संपूर्ण जगभर सुरू आहे. यात भारत देखील मागे नाही.
भारतातही लिओनेल मेस्सीचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे भारतातही ठिकठिकाणी अर्जेंटिनाच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं गेलं. यात केरळमध्ये तर फुटबॉल चाहत्यांनी चक्क बाईकरॅलीच काढली. यात तरुण अर्जेटिंनाची जर्सी परिधान करुन संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. काहींनी तर अर्जेंटिनाचा राष्टध्वज देखील हातात घेत अर्जेंटिनाच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं. सोशल मीडियात या बाईक रॅलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून केरळचं फुटबॉल प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
BTW… India celebrate @argentina winning Copa America. pic.twitter.com/NZoe9jg1xl
— Juan Arango (@JuanG_Arango) July 11, 2021
केरळसोबतच महाराष्ट्रात कोल्हापुरातही अर्जेंटिनाच्या विजयानंतर हलकीच्या तालावर तरुणाईनं ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तर पश्चिम बंगालमध्येही मेस्सीच्या चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं.
दरम्यान, ब्राझीलनं २०१९ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. परंतु, दुखापतीमुळे या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू नेमार खेळू शकला नव्हता. त्यामुळे यंदा नेमारच्या उपस्थितीत ब्राझील पुन्हा एकदा जेतेपद पटकावणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तर अर्जेंटिना तब्बल २८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी सज्ज होता. हा सामना काहीसा खास ठरला. कारण या सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकाच मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळाले. मेस्सी आणि नेमार हे दोन फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. सामन्यात अर्जेंटिनाच्या डीमारिया यानं एकमेव गोल करुन संघाला विजय प्राप्त करुन दिला.