ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १६ - सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा सध्या इंग्लंडमधल्या क्रिकेटवर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना नेट्समध्ये डावखु-या मध्यमगती गोलंदाजीचा सराव दिला असून प्रसारमाध्यमांनी याची चांगलीच दखल घेतली आहे. डेली मेल व गार्डियन या वृत्तपत्रांनी या वृत्ताला प्रसिद्धी दिली आहे, शिवाय खुद्द लॉर्डस ग्राउंडच्या ट्विटर हँडलवर अर्जन तेंडूलकरने लॉर्ड्सवर, फक्त लॉर्ड्सवर नेट्समध्ये सराव केला असं ट्विट करण्यात आलंय.
डेली मेलने अर्जुनच्या ४२ चेंडूंमध्ये ११८ धावांच्या खेळीचा उल्लेख करत त्याच्या बॅटिंगच्या कौशल्याचाही उल्लेख केला आहे. क्रिक इन्फोच्या बातमीवर अर्जुन हा लॉर्ड्स इनडोअर स्टेडियममध्ये नियमित खेळणारा खेळाडू असल्यामुळे त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे जॉन्सन आणि स्टार्क हे डावखुरे जलदगती गोलंदाज सगळ्या फलंदाजांना डोईजड ठरतात हा इतिहास बघता डावखु-या वेगवान गोलंदाजीचा इंग्लंडच्या फलंदाजांना सराव मिळावा म्हणून अर्जुनला पसंती देण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या सरावाचा फायदा अर्जुनलाही होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. इंग्लंड संघाचा गोलंदाजीचे प्रशिक्षक ओटिस गिबसन, अॅलेस्टर कुक व वासिम अक्रमसारख्या दिग्गजांनी अर्जुनला टिप्स दिल्या आहेत.