ऑनलाइन लोकमत
लॉर्ड्स, दि. 6 - क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या एका वेगवान चेंडूमुळे इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेयरस्टो जखमी झाला आहे. क्रिकेटचा सराव करण्यासाठी अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये आहे, इंग्लंडच्या संघासोबत सराव करत असताना अर्जुनच्या एका चेंडूवर बेयरस्टो जखमी झाला.
इंग्लंडच्या संघाला 6 जुलै म्हणजे आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सामना करायचा आहे. दोन्ही संघांमध्ये 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेची तयारी करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू जो रूटच्या नेतृत्वात सराव करत होते. याचवेळी अर्जुनही त्यांच्यासोबत सहभागी झाला होता. अर्जुन नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी त्याच्यासमोर फलंदाजीसाठी जॉनी बेयरस्टो आला.
अर्जुनच्या पहिल्याच चेंडूचा बेयरस्टो सामना करत होता आणि तो यॉर्कर चेंडू होता. अर्जुननं टाकलेला हा यॉर्कर थेट बेयरस्टोच्या अंगठ्यावर जाऊन आदळला आणि बेयरस्टोला नेट प्रॅक्टीस सोडावी लागली.
आजपासून इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेला सुरूवात होत आहे. त्यातही बेयरस्टोची जखम जास्त गंभीर नसल्याचं वृत्त इंग्लंडसाठी समाधानकारक आहे. जखम गंभीर नसल्यामुळे आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून सुरू होणा-या पहिल्या कसोटी सामन्यात फॅफ डु प्लेसिस खेळणार नाही. त्याच्याजागी डीन एल्गर संघाचं नेतृत्व करणार आहे. डु-प्लेसिसला नुकतंच पुत्ररत्न झालं आहे, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे.