२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राला हरवून पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं आणि पाकिस्तानात एकच जल्लोष झाला. कारण पाकिस्तानचं हे आतापर्यंतच पहिलंच वैयक्तिक सुवर्णपदक होतं. अर्शदनं ज्या परिस्थितीत हे सुवर्णपदक पटकावलं, त्याचंही मोल खूपच मोठं होतं. अगदी ऑलिम्पिक स्पर्धेला जाईपर्यंतही त्याला चांगल्या भाल्यासाठी वणवण करावी लागली. अनेक आर्थिक विवंचना असतानाही त्यानं आपला सराव सुरू ठेवला आणि शेवटी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंच. ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडताना त्यानं नव्वद मीटरच्या पलीकडे म्हणजे ९२.९७ मीटर अंतरावर भाला फेकला. अर्शदचं हे यश खरोखरच मोठं होतं. सततच्या हालअपेष्टांनी आणि आर्थिक विवंचनांनी जर्जर असलेला पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेलाही अर्शदच्या या कामगिरीनं आनंद झाला नसता तरच नवल. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि इतर खासगी संस्था, उद्योगपतींनीही अर्शदनं ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावताच त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.
या साऱ्यामुळे अर्शदच्या पाठीमागे लागलेलं आर्थिक शुक्लकाष्ठ एकदाचं संपलं असेल. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अर्शदनं या बक्षिसांमागचं रहस्यही उघड केलं. सरकारनं जाहीर केलेल्या बक्षिसांची रक्कम तर त्याला मिळाली; पण ज्या खासगी संस्थांनी मोठ्या रुबाबात मोठमोठ्या आकड्यांच्या बक्षिसाची जी रक्कम जाहीर केली होती, त्यातल्या बऱ्याच जणांनी अजून बक्षिसाची ही रक्कम देण्याचं नाव घेतलेलं नाही. बक्षिसाच्या रकमा जाहीर करून त्यांनी स्वत:चं कौतुक तर करून घेतलं, दानशूरपणाचा मोठा आवही आणला, पण ही रक्कम देण्यात अजून तरी त्यांनी हात आखडताच घेतलेला आहे. ही रक्कम मला कधी मिळेल आणि मिळणार नाही, याबद्दल मला काहीही माहीत नाही, असं अर्शदनं थेटच सांगितलं. पाकिस्तानच्या ‘वॉटर ॲण्ड पॉवर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (WAPDA) या संस्थेनं अर्शदला दहा लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं, तर LESCO या संस्थेनं अर्शदच्या प्रमोशनसाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय इतरही काही संस्थांनी ‘उदार’ हस्ते अर्शदवर बक्षिसांची उधळण केली होती; पण अजूनपर्यंत त्यातल्या अनेकांनी एक पैसाही अर्शदला दिलेला नाही.
भरीस भर म्हणजे अर्शदची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे, तो गरीब नाही, असा अपप्रचारही काहींनी केला. त्याला उत्तर देताना अर्शदनं म्हटलं, मी किती ‘श्रीमंत’ आहे, हे मला आणि जे मला ओळखतात त्या साऱ्यांनाच ठाऊक आहे. मी खरंच ‘श्रीमंत’ आहे. माझा खेळ आणि माझी आजवरची पदकं हीच माझी आजवरची संपत्ती आणि श्रीमंती आहे. त्याचा मला अभिमान आहे. खेळण्यासाठी मी जोपर्यंत उधार-उसणवाऱ्या करत होतो, कर्ज काढत होतो, तेव्हाही मी माझ्या खेळापोटी असलेल्या ध्येयानं आणि मेहनतीनं श्रीमंतच होतो; पण सरकारनं जेव्हा मला आर्थिक मदत सुरू केली, त्यावेळी स्पर्धेसाठी आणि खेळासाठी पैशांचा विचार मला फारसा करावा लागला नाही, हेदेखील खरं आहे. कारण माझ्या खेळाच्या खर्चाचा भार मग सरकारनं उचलला. जे माझ्या ‘श्रीमंती’चे दाखले सोशल मीडियावर देताहेत, त्यांना माझ्यावरच्या कर्जाचे आकडे बँकांच दाखवतील, या शब्दांत त्यानं आपल्यावर सुरू असलेल्या खोट्या आरोपांचा समाचार घेतला.
मी फक्त देशासाठी खेळलो आणि खेळतो आहे, अर्थातच त्यामुळे माझंही नाव मोठं झालं, हे खरं आहे; पण मला बदनाम करण्यासाठी लोकांनी इतक्या खालच्या पातळीला जावं याबद्दल मला फार दु:ख झालं, असंही अर्शदनं बोलून दाखवलं. ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकानंतर अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव तर झाला, पण त्यामागची वस्तुस्थिती हीदेखील आहे. महत्त्वाचं म्हणजे टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत विजेत्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम (प्राइज मनी) मिळत नव्हती, पॅरिस ऑलिम्पिकपासून ॲथलेटिक्स आणि बॉक्सिंगसारख्या काही खेळांतील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम दिली जात आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शदला ५० हजार डॉलर्स (पाकिस्तानी एक कोटी ४० लाख रुपये) देण्यात आले होते.
सुवर्ण जिंकल्यावर सासऱ्यानं दिली म्हैस!ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर पाकिस्तानी जनतेच्या मनात अर्शदविषयीचा अभिमान वाढला आहे. तेव्हापासून सगळीकडे त्याचं गुणगान सुरू आहे. अर्शदची स्वत:ची आर्थिक परिस्थिती तर बेतास बात होतीच; पण त्याची सासुरवाडीही सर्वसामान्यच आहे. अर्शदनं ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्या सासऱ्यानं, मोहम्मद नवाज यांनीही मोठ्या अभिमानानं त्याला म्हैस भेट दिली! पाकिस्तानच्या ग्रामीण भागात एखाद्याचा सन्मान करण्यासाठी त्याला म्हैस भेट दिली जाते.