सिडनी : आॅस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि सर डॉन ब्रॅडमन यांचे सहकारी आर्थर मॉरिस यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.डावखुरे फलंदाज राहिलेले मॉरिस यांनी ४६ कसोटींत ३५३३ धावा केल्या. २००० मध्ये जाहीर झालेल्या आॅस्ट्रेलियाच्या ‘टीम आॅफ सेंच्युरी’त त्यांचा समावेश होता. १९४८ च्या इंग्लंड दौऱ्यात मॉरिस यांनी सलग नाबाद राहून सर्वाधिक धावा ठोकल्या. अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ओव्हलवर त्यांनी नाबाद १९६ धावांची अविस्मरणीय खेळी केली. सीएचे अध्यक्ष वॉली एडवर्डस् यांनी मॉरिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचा दुवा निखळल्याचे सांगितले. आॅस्ट्रेलियाचे ते सर्वोत्कृष्ट सलामीवीर होते. सिडनीत जन्मलेले मॉरिस यांनी १८ वर्षांच्या वयात न्यू साऊथ वेल्सविरुद्ध प्रथमश्रेणी सामन्यात दोन्ही डावांत शतके ठोकली होती. दोनदा आॅस्ट्रेलियाचे कर्णधार राहिलेले मॉरिस यांनी एकूण १२ शतके ठोकली. १९५१ च्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध केलेली २०६ धावांची खेळी सर्वश्रेष्ठ होती.
आर्थर मॉरिस यांचे निधन
By admin | Published: August 23, 2015 2:11 AM