ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये भरत अरुण यांच्या निवडीसाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या रवी शास्त्रींनी आज पहिल्यांच याविषयी जाहीर मतप्रदर्शन केले. भरत अरुण यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी चांगली आहे. त्यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यापूर्वी एकदा कामगिरीवर नजर टाका म्हणजे त्यांची निवड का केली हे समजेल असे रवी शास्त्रींनी टीकाकारांना सुनावले आहे.
श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षण रवी शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शास्त्री म्हणाले, "भरत अरुण यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी चांगली आहे. भरत अरुणची कामगिरी तपासून पाहा, त्यानंतर कळेल गोलंदाज प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड का केली." तसेच गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटने मिळवलेले यश सांघिक यश असून,यात कोणा एका व्यक्तीचे योगदान नाही, असा टोलाही शास्त्री यांनी लगावला.
अधिक वाचा
नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणी मान्य करताना बीसीसीआयने मंगळवारी भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. त्यामुळे या पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. शास्त्री भारतीय संघाचे संचालक होते त्या वेळी अरुण गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी लवकरच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अरुण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला होता.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने केलेली शिफारस डावलून बीसीसीआयने भरत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले होते.