कार्डिफ : क्रिकेट विश्वातील सर्वाधिक चर्चित आणि संघर्षपूर्ण अॅशेस मालिकेला बुधवारपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध अॅशेसची मागील मालिका आॅस्ट्रेलियाने ५-० अशी एकतर्फी जिंकली होती. डावखुरा मिशेल जॉन्सन याने भेदक माऱ्याद्वारे इंग्लंडचे कंबरडे मोडले होते. त्याआधी इंग्लंडने सलग तीनदा ही मालिका जिंकली, हे विशेष. २००९मध्ये २-१ने, २०१०-११मध्ये ३-१ने आणि २०१३मध्ये ३-० अशा फरकाने इंग्लंडने विजयाची नोंद केली. आॅस्ट्रेलियाने २०१३मध्ये इंग्लंड दौरा केला तेव्हा इंग्लंडने त्यांच्याविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. आता दोन्ही संघ नव्याने सज्ज आहेत. आयसीसी क्रमवारीत आॅस्ट्रेलिया १११ गुणांसह दुसऱ्या, तर इंग्लंड ९६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. उभय संघांच्या रँकिंगमध्ये ४ स्थानांचे अंतर असेल; पण इंग्लंडला नमविणे आॅस्ट्रेलियासाठी सोपे नाही. आॅस्ट्रेलियाने विंडीजला त्यांच्याच देशात २-०ने पराभूत केले. इंग्लंडने आपल्या देशात न्यूझीलंडला १-१ असे बरोबरीत रोखले. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या तुलनेत आॅस्ट्रेलिया सध्या भक्कम आहे. कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क म्हणाला, ‘‘आम्ही खेळभावना जपून आक्रमक खेळ करू. आमचा संघ आक्रमकतेसाठी ओळखला जात असला, तरी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळभावनेचा सन्मान करू. आम्ही त्याचे कधीही उल्लंघन केले नाही. खेळाडूंना मर्यादेत राहून खेळणे माहिती आहे. संयमित आणि शिस्तबद्ध खेळ करणे, हे आमचे ध्येय आहे.’’ क्लार्क करिअरमध्ये चौथ्यांदा अॅशेस दौऱ्यावर इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. मालिका सुरू होण्याआधी वेगवान गोलंदाज रेयॉन हॅरिस याने घेतलेली निवृत्ती त्याच्यासाठी चिंतेचा विषय असेल. खेळपट्टीबाबत क्लार्क म्हणाला,‘‘मैदानावर गवत अधिक असल्याचे कळले. यजमानांना आधी फलंदाजी करताना पाहणे रंजक ठरेल. आधी फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजी करायची झाल्यास झटपट गुंडाळण्याचे लक्ष्य असते. आॅस्ट्रेलियात सुरुवात चांगली झाल्यास अर्धशतक ठोकणे सहजसोपे जाते. ’’इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याने युवा खेळाडूंच्या बळावर आॅस्ट्रेलियाला आव्हान देण्याचे ठरविले आहे. संघात असलेल्या नव्या चेहऱ्यांना अनुभव कमी असेलही, पण आत्मविश्वास व झुंजारवृत्तीच्या बळावर हा संघ आॅस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरू शकण्यात सक्षम वाटतात. इंग्लंडचे कोच ५२ वर्षांचे आॅस्ट्रेलियन ट्रॅव्हर बेलिस आहेत. जॉन्सनला थोपविण्यासाठी त्यांनी नवे डावपेच आखले असावेत. मागच्या मालिकेत त्याने एकट्याच्या बळावर अॅशेस जिंकून दिले होते. इंग्लंडसाठी आनंदी वार्ता अशी, की त्यांचा कर्णधार कूक याला सूर गवसला आहे. (वृत्तसंस्था)
इंग्लंड-आॅस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ‘अॅशेस संग्राम’
By admin | Published: July 08, 2015 1:02 AM