मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रीडा प्राधिकरणाने "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. देशाच्या टारगेट ऑलम्पिक पोडियम (TOPS) योजनेसाठी काम करणारी "लक्ष्य ऑलम्पिक मिशन" ही 16 सदस्यीय समिती असून त्यामध्ये अँड आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार अँड आशिष शेलार यांनी यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पद भूषवले होते. तसेच फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, दोरी उड्या असोसिएशनचे कार्याध्यक्ष या संघटनांच्या मध्येही त्यांनी काम केले आहे. खेळाची आवड असलेले आमदार अँड आशिष शेलार हे राजकारणासोबतही क्रीडा क्षेत्रातील सक्रिय सहभागी आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये त्यांच्यावर क्रीडा मंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. तसेच फुटबॉल, क्रिकेट, हाँकी, धनुष्यबाण, बास्केट बाँल, स्केटिंग या खेळांसाठी त्यांनी वांद्रे येथे दोन मैदाने निर्माण केली तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मार्फत मुंबई प्रिमियम लिग ही त्यांनी सुरु केली.
लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेमध्ये भारत सरकारच्या युवा मंत्रालयाने हे मिशन सुरू केले आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (NSDF) च्या अंतर्गत ऑलिम्पिक खेळांमध्ये ऑलिम्पिक पोडियम प्राप्त करण्याची क्षमता निर्माण करणे, जास्तीत जास्त पदक, उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी योजनांची अंमलबजावणी आणि देखरेख तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने ही समिती कार्यरत आहे.
या समितीचे अध्यक्ष क्रीडा महासंचालक असून अध्यक्ष, अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ, अध्यक्ष, भारतीय तिरंदाजी असोसिएशन,अध्यक्ष, भारतीय बॉक्सिंग फेडरेशन आदींसह . बायचुंग भुतिया (फुटबॉल), अंजू बॉबी जॉर्ज (अॅथलेटिक्स), अंजली भागवत (शूटिंग), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन), सरदारा सिंग, (हॉकी), वीरेन रस्किन्हा, (हॉकी आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट), मालव श्रॉफ (नौकान आणि क्रीडा विज्ञान विशेषज्ञ), मोनालिसा मेहता (टेबल टेनिस), दीप्ती बोपय्या (सीईओ गोस्पोर्ट्स फाउंडेशन), श्री योगेश्वर दत्त (कुस्ती), श्री गगन नारंग (शूटिंग) आदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा यामध्ये समावेश असून या व्यतिरिक्त आमंत्रित करण्यात आलेले आमदार अँड आशिष शेलार हे एकमेव सदस्य असून याबाबतचे पत्र नुकतेच क्रिडा प्राधिकरणाने त्यांना दिले आहे.