पॅरिस : आठव्या मानांकित अॅश्ले बार्टी हिने फ्रेंच ओपनच्या महिला एकेरी फायनलमध्ये शनिवारी येथे झेक प्रजासत्ताकच्या १९ वर्षीय मार्केटा वोंद्रोयुसोवा हिचा सहज पराभव करीत आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने अवघ्या ७0 मिनिटांत विजेतेपदाच्या लढतीत मार्केटा वोंद्रोयुसोवा हिचा ६-१, ६-३ असा पराभव केला. या विजयाबरोबरच बार्टीने ४६ वर्षांनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी पहिली आॅस्ट्रेलियाची खेळाडू म्हणून बहुमान मिळवला. याआधी १९७३ मध्ये मार्गेट कोर्टने पॅरिसमध्ये चॅम्पियन बनणारी आॅस्ट्रेलियन खेळाडू होती. ३३ वर्षीय बार्टीला या विजयाचा फायदा तिच्या रँकिंगला मिळेल. ती रँकिंगमध्ये जपानच्या नाओमी ओसाकानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.
पुरुषांच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे दुसऱ्यांदा सर्वच ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणारा दुसरा खेळाडू बनण्याचे स्वप्न डोमिनिक थिएम याने उद्ध्वस्त केले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस आणि चार तासांपेक्षा जास्त वेळ रंगलेल्या या उपांत्य फेरीत थिएमने जोकोविच याच्या ग्रँडस्लॅममधील सलग २६ सामने जिंकण्याची मालिकाही खंडित केली. चौथ्या मानांकित थिएम याने जोकोविच याचे आव्हान ६-२, ३-६, ७-५, ५-७, ७-५ असे मोडीत काढताना फायनलमध्ये धडक मारली. थिएमची फायनलमध्ये गाठ पडणार आहे ती ११ वेळेचा विजेता आणि गत चॅम्पियन राफेल नदालशी पडणार आहे.