हैदराबाद : भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम नोंदवला. आश्विनने ४५ कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना आॅस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिलीचा विक्रम मोडला. लिलीने ४८ कसोटी सामन्यांत हा पराक्रम केला होता. आश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात २ बळी घेत या विक्रमाला गवसणी घातली.अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), झहीर खान (३११) आणि बिशनसिंग बेदी (२६६) यांच्यानंतर २५० कसोटी बळी घेणारा आश्विन सहावा भारतीय गोलंदाज ठरला. आश्विनने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ५९ बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावाच्या अखेरपर्यंत त्याने २४ वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले असून सामन्यांत सात वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्याने चार शतके झळकावताना १८१६ धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)विक्रम नोंदवला, चांगले झाले : आश्विनविक्रम नोंदवला, चांगले झाले, अशी प्रतिक्रिया रविवारी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद २५० बळींचा टप्पा गाठण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी त्याने हा पराक्रम केला. आज मी सुरुवातीपासून गोलंदाजीचा आनंद घेतला. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना अधिक मदत मिळत नाही. आम्हाला सोमवारी सकाळच्या सत्रात संयम बाळगावा लागेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना विशेष आनंद मिळाला. मला पहिल्या डावात विशेष चांगली कामगिरी करता आली नाही, पण दुसऱ्या डावात सूर गवसला.
आश्विनने मोडला लिलीचा विक्रम
By admin | Published: February 13, 2017 12:10 AM