दुबई : भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी गोलंदाजांच्या जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत आपले अव्वल दोन क्रमांक कायम राखले आहे तर कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत स्टीव्हन स्मिथनंतर दुसऱ्या स्थानी कायम आहे. अश्विन (८८७ मानांकन गुण) आणि जडेजा (८७९) क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत तर २९ मानांकन गुणांची कमाई करणारा आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड (८६०) तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत हेजलवुडची कामगिरी उल्लेखनीय ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने मानांकनामध्ये सुधारणा केली आहे. त्याने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झेप घेतली आहे. अव्वल वीसमध्ये स्थान मिळवणाऱ्या अन्य भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीचा समावेश आहे. शमी १९ व्या स्थानी आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत स्टीव्हन स्मिथ (९३३) अव्वल स्थानी कायम आहे. त्याला चार मानांकन गुणांचे नुकसान सहन करावे लागले. भारतीय कर्णधार विराट कोहली (८७५) दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल १० फलंदाजांमध्ये अन्य भारतीय फलंदाजांना स्थान मिळवता आलेले नाही. चेतेश्वर पुजारा १२ व्या तर अजिंक्य रहाणे १६ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)आयसीसी कसोटी मानांकनामध्ये भारत १२० मानांकन अकांसह अव्वल स्थानी आहे. आॅस्ट्रेलिया (१०९) दुसऱ्या स्थानी कायम आहे. (वृत्तसंस्था)
अश्विन, जडेजाचे स्थान कायम
By admin | Published: January 09, 2017 12:59 AM