दुबई : रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा ही भारतीय जोडी आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये संयुक्तरीत्या अग्रस्थानी पोहोचलेली फिरकीपटूंची पहिली जोडी बनली आहे.भारताने मंगळवारी दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीच आॅस्ट्रेलियाला ७५ धावांनी पराभूत केले. या विजयात जडेजा-अश्विनच्या जोडीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जडेजाने सात बळी घेताना, पहिल्या डावात सहा बळी घेतले होते. त्याला कारकिर्दीत प्रथमच अग्रस्थान मिळाले आहे. एप्रिल २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन व श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन यांनी संयुक्त अग्रस्थान पटकावले होेते.आश्विननेही बंगलोर कसोटीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने सामन्यात आठ बळी मिळवत माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांची २६६ बळींची कामगिरी मागे टाकली. त्याने २६९ बळी मिळवत भारताच्या सर्वांत यशस्वी पाच गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले. कोहलीने आतापर्यंत या मालिकेत फक्त ४० धावा केल्या आहेत. त्यामुळे ज्यो रुट दुसऱ्या स्थानी आला असून, कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजाराला पाच स्थानाचा फायदा झाला असून, तो सहाव्या स्थानी आला आहे. (वृत्तसंस्था)
आश्विन, जडेजा संयुक्त अग्रस्थानी
By admin | Published: March 09, 2017 1:33 AM