ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 25 - आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कारकिर्दीतील ३७ व्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी किवी कर्णधार केन विलियम्सनला बाद करीत कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला. सर्वांत कमी सामन्यांत असा पराक्रम करणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी, आॅस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटने ३६ कसोटी सामन्यात २०० बळी घेतले आहेत. अश्विनने आज डेनिस लिली व वकार युनिस यांना पिछाडीवर सोडले. त्यांनी ३८ कसोटी सामन्यांत बळींचे द्विशतक नोंदवले होते. सध्या क्रिकेट खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने ३९ सामन्यांत बळींचे द्विशतक पूर्ण केले आहे. भारतातर्फे आॅफ स्पिनर हरभजन सिंगने ४६ सामन्यांत २०० बळी पूर्ण केले होते. अनिल कुंबळेने ४७, भगवत चंद्रशेखरने ४८ तर कपिल देवने ५० सामन्यांत २०० बळींचा टप्पा गाठला. यावर अश्विननंही प्रतिक्रिया दिली आहे. विक्रमबाबत चर्चा करणे घाईचे ठरणार असून अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, अशी प्रतिक्रिया सर्वांत वेगवान २०० बळींचा पल्ला गाठणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरलेला भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. ग्रीनपार्कमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत ३ बळी घेणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अश्विन म्हणाला,ह्यमाझ्या कामगिरीबाबत आताच चर्चा करणे घाईचे ठरेल. मला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. यंदाच्या मोसमात १२ कसोटी सामने खेळायचे आहे. माझ्या मते एकावेळी एका दिवसाच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.ह्ण अलीकडेच वयाची तिशी गाठणारा अश्विन म्हणाला,ह्यएकाग्रता कायम राखली नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये पिछाडीवर जाण्यास वेळ लागत नाही. जर काही मिळवायचे असेल तर स्वार्थी असायला हवे. कसोटी क्रिकेटची तयारी करताना एकावेळी एकाच दिवसाच्या खेळाबाबत विचार करावा लागतो. आव्हानाला सामोरे जाण्यास आवडते. या लढतीत विलियम्सन व टेलर चांगले खेळत होते. सामन्यातील यश सर्वकाही प्रतिस्पर्धी फलंदाजांचा ताळमेळ, परिस्थिती आणि सामन्याच्या स्थितीवर अवलंबून असते
भारतातर्फे २०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे ६१९
कपिल देव ४३४
हरभजन सिंग ४१७
झहीर खान ३११
बिशन सिंग बेदी २६६
चंद्रशेखर २४२
जवागल श्रीनाथ २३६
ईशांत शर्मा २०९
रविचंद्रन अश्विन २००