ऑनलाइन लोकमतसेंट लुसिया, दि. १० : वेस्ट इंडिजविरुध्दचा तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांची मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पहिल्याच दिवशी अडचणीत आला. पण मोक्याच्या वेळी रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते. आघाडीचा फलंदाज राहुलने ५० व राहानेने ३५ धावांचे योगदान दिले.दरम्यान, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली स्वस्तात परतल्यानंतर आणि अर्धशतकवीर लोकेश राहुलही (५०) बाद झाल्याने भारताने चहापानापर्यंत ५२ षटकात ५ बाद १३० धावांची मजल मारली होती. विशेष म्हणजे मालिकेत प्रथमच संधी देण्यात आलेला रोहित शर्माही (९) अपयशी ठरल्यानंतर भरवशाचा अजिंक्य रहाणे (३५) खराब फटका मारुन परतला. पण अश्विन आणि साहा यांनी विकेटन पडू देता खेळपट्टीवर उभे ठाकले.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. कर्णधार जेसन होल्डरचा विश्वास गोलंदाजांनी सार्थ ठरवताना भारतीयांना जखडवून ठेवले. सलामीवीर शिखर धवन अडखळत खेळत असताना दुसरीकडे राहुल आत्मविश्वासाने खेळत होता. शॅनन गॅब्रियलने धवनला (४) यष्टीरक्षक शेन डॉर्विचकरवी बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. भारत या धक्क्यातून सावरत असतानाचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफने कर्णधार विराट कोहलीला स्लीपमध्ये डॅरेन ब्रावो करवी झेलबाद केले.
या निर्णायक बळीनंतर विंडिजला राहुलच्या तंत्रशुध्द फटकेबाजीला सामोरे जावे लागले. यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी घेत खेळपट्टीचा अंदाज घेतला. तर, स्थिरावलेल्या राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, अष्टपैलू रोस्टन चेसने राहुलला क्रेग ब्रेथवेटकरवी झेलबाद करुन पुन्हा भारताला बॅकफूटवर आणले. राहुलने ६५ चेंडूत ६ चौकारांसह ५० धावा फटकावल्या. त्याने रहाणेसह तिसऱ्या बळीसाठी ५८ धावांची भागीदारी केली.
यानंतर रोहित शर्माच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून जोसेफचा शिकार ठरल्याने भारताची ४ बाद ८७ अशी अवस्था झाली. रहाणे आणी अश्विन यांनी पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रहाणे - अश्विन भारताला सावरणार असे दिसत असतानाच रहाणेचा चेसला स्वीप करण्याचा अंदाज चुकला आणि तो त्रिफळाचीत झाला. रहाणेच्या य चुकीमुळे भारताचा अर्धा संघ १२६ धावांत परतला. उद्या भारताला अश्विन, साहा, जडोजा यांचाकडून खेळपट्टीवर टिकून धावा वाढवण्याच्या आशा असतील.