सर्वबाद ३५३ धावा : दोघांचेही निर्णायक शतक; सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारीग्रास इसलेट, दि. ११ : आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साहा (१०४) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३५३ धावा उभारल्या. प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर अश्विन - साहा यांनी सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक भागीदारी करुन भारताला सावरले.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमानांनी भारताचे आघाडीचे ५ फलंदाज बाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत अश्विन - साहा यांनी त्यांना बळी घेण्यापासून रोखले. ५ बाद २३४ या धावसंख्येपासून सुरुवात करताना या जोडिने पहिल्या सत्रात ८२ धावांची भर टाकली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासाने खेळताना अश्विन - साहा जोडिने दमदार खेळ करताना यजमानांचा चांगलाच सामाचार घेतला.
अश्विनने २९७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व एका षटकारासह दमदार ११८ धावांची संयमी आणि निर्णायक खेळी केली आहे. तर त्याला मोलाची साथ दणाऱ्या साहाने २२७ चेंडूत १३ चौकारांसह १०४ धावा फटकावल्या. अल्झारी जोसेफने साहाला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर अवघ्या १४ धावांत ४ बळी गेल्याने भारताचा डाव संपुष्टात आला. अष्टपैलू रविंद्र जडेजा (६) झटपट परतल्यानंतर भुवनेश्वर कुमार व इशांत शर्मा खेळपट्टीवर हजेरी लावून गेले. तर मिग्युएल कमिन्सने अश्विनला बाद केले. संक्षिप्त धावफलक :भारत (पहिला डाव) : ११५ षटकात सर्वबाद ३५३ धावा (लोकेश राहुल ५०, अजिंक्य रहाणे ३५, आर. अश्विन खेळत आहे ११८, वृध्दिमान साहा १०४; मिग्युएल कमिन्स ३/५४, अल्झारी जोसेफ ३/६९, रोस्टन चेस २/७०, शॅनन गॅब्रियल २/८४)