नवी दिल्ली : बांगलादेशने ओमानला निर्णायक सामन्यात नमवून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला खरा, मात्र बांगलादेशच्या पाठीराख्यांना लक्षात राहिला तो भारताचा हुकमी फिरकीपटू रविचंद्रन आश्विन. या सामन्यादरम्यान आश्विनने टिष्ट्वट केले, की ‘बांगलादेश - ओमान सामना पाहा. जर बांगलादेश जिंकला तर पूर्ण देश जल्लोष करेल. मात्र ओमान जिंकल्यास हा क्रिकेटविजय असेल.’ आश्विनच्या या टिष्ट्वटचा बांगला चाहत्यांनी चांगलाच समाचार घेताना शाब्दिक लढाई सुरू केली.या टिष्ट्वटनंतर बांगलादेशच्या आझादनामक चाहत्याने आश्विनला उद्देशून टिष्ट्वट केले, की ‘तुम्हाला बांगलादेशचा सामना करायचा नसल्याने तुम्ही ओमानच्या विजयासाठी बोलत आहात.’ यानंतर आश्विननेदेखील खरपूस समाचार घेत उत्तर दिले, ‘मी तुमच्या या टिष्ट्वटला माझ्याजवळ राखू इच्छितो. मात्र हा वेळेचा अपव्यय होईल.’लगेच मेहंदी हसननामक दुसऱ्या बांगला चाहत्याने टिष्ट्वट केले, ‘तुम्ही बघत राहा, आम्ही येत आहोत.’ अब्दुल्ला काफी याने टिष्ट्वट केले, ‘आश्विन बांगलादेशच्या प्रत्येक सामन्यादरम्यान पोस्ट करीत राहा. तमीम शतक झळकावेल आणि बांगलादेश जबरदस्त प्रदर्शन करून सामना जिकेल.’ यावर पुन्हा एकदा आश्विनने प्रत्युत्तर दिले, ‘ओके डील, पण जेव्हा त्यांचा सामना भारताविरुद्ध असेल तेव्हा धोका पत्करू नका.’ यानंतर लेगच आशिक नावाच्या बांगलादेशी चाहत्याने टिष्ट्वट केले, ‘आश्विन तू बरोबर म्हणतोयस. जर बांगलादेश जिंकला तर पूर्ण बांगलादेश आनंदी होईल. पण जर ओमान जिंकला तर केवळ भारत आनंदी होईल.’ यावर आश्विनने उत्तर दिले, ‘आशिक, ओमानचे काय? जरी तुमचे मानले तरी एक विरुद्ध दोन देश असेच चित्र होईल. टिष्ट्वटचा अर्थ समजून घ्या.’ या सर्व टिष्ट्वटवॉरदरम्यान बांगलादेशने ओमानला नमवून सुपर १० मध्ये प्रवेश केला. मात्र आता २३ मार्चला बंगळुरुमध्ये रंगणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश लढतीवेळीही अशाच प्रकारचे टिष्ट्वटवॉर रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वृत्तसंस्था)
बांगलादेशी चाहत्यांची आश्विनने घेतली फिरकी
By admin | Published: March 15, 2016 3:23 AM