India vs Japan, Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीयहॉकी संघाने कांस्यपदकाची कमाई केली. जकार्ता येथे बुधवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जपानचा १-० असा पराभव केला. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल राज कुमार पालने सामन्याच्या सातव्या मिनिटाला केला. त्यानंतर पूर्ण सामन्यात गोल होऊ शकला नाही. त्यामुळे भारताला विजय मिळवला. आता सुवर्णपदकासाठी कोरिया आणि मलेशिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
आशिया कप हॉकी स्पर्धा ही प्रतिष्ठित स्पर्धा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ही पात्रता स्पर्धा आहे. विश्वचषक भारतात असल्याने भारतीय संघ आधीच विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. साखळी सामन्यांसाठी भारताला जपान, पाकिस्तान आणि यजमान इंडोनेशियासह पूल A मध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेशला पूल B मध्ये स्थान देण्यात आले. अखेर भारतासह जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाने सुपर ४ टप्प्यात स्थान मिळवले.
सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारताने जपानचा २-१ असा पराभव केला होता. त्यानंतर मलेशियासोबत ३-३ असा सामना बरोबरीत सोडवला होता. तर तिसऱ्या सामन्यात भारताने कोरियासोबत ४-४ अशी बरोबरी साधली. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. पण कांस्यपदकाच्या सामन्यात भारताने जपानला १-०ने नमवून पदक मिळाले.