बरनाला (पंजाब) - हकाम सिंग भट्टल, हे नाव आपल्यापैकी अनेकांना माहितही नसेल, आशियाई स्पर्धेत त्यांनी जेव्हा सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी अनेकांचा जन्मही झाला नसेल. पण, हे नाव पुन्हा आठवण करून देण्यामागचे एकच कारण आहे. भारताला 1978च्या आशियाई स्पर्धेत 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत हकाम यांनी सुवर्णपदक जिंकून दिले होते आणि आज वयाच्या 64व्या वर्षी हा खेळाडू मृत्यूशी झुंज देत आहे. यकृत आणि मुत्रपिंडच्या आजाराने ग्रस्त असलेले हकाम येथील संग्रूर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणारे पैसा कुटुंबीयांकडे नाही आणि मदतीसाठी त्यांची सरकारी कचेरीत पायपीट सुरू आहे.
क्रीडा क्षेत्रातील योगदानासह त्यांनी देशसेवाही केली आहे. 1972 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले. मात्र, त्यांचे दुर्दैव कुटुंबीयांना त्यांना उपचारासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे हकाम हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री राजींदर कौर भट्टल यांच्या गावातील रहिवाशी आहेत. हकाम यांना 29 ऑगस्ट 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते ध्यान चंद पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
" 1987मध्ये सैन्यातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर 16 वर्षे ते आर्थिक संकटात आहेत. 2003 मध्ये त्यांना नशीबाची साथ मिळाली. पंजाब पोलिसांनी त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. 2014 मध्ये ते या जबाबदारीतून मुक्त झाले. मात्र आता त्यांच्या आजारपणात राज्य सरकारकडून कोणतिही मदत मिळालेली नाही," असे हकाम यांची पत्नी बेनत कौर यांनी सांगितले.