नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने पुन्हा एकदा बजरंग पुनियाच्या नावाची शिफारस खेल रत्न पुरस्कारासाठी केली आहे. गतवर्षीही या पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, परंतु 2018च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकूनही त्याला हा पुरस्कार नाकारण्यात आला होता. पण, यंदा त्याला हा पुरस्कार मिळण्याची शक्यता अधिक आहे. बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते. कुस्ती महासंघाने या पुरस्कारासाठी विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली आहे.
पुरस्कार निवड समितीनेही बजरंगचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवले आहे. त्यामुळे बजरंगला यंदा हा पुरस्कार मिळेल, हे निश्चित झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानीला ( 65 किलो ) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते.
बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले. 2018च्या कामगिरीमुळे कुस्ती महासंघाने त्याच वर्षी बजरंगचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवले होते. परंतु भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना 2018चा खेल रत्न देण्यात आला.