बँकॉक : दीपिका कुमारी हिने येथे सुरू असलेल्या २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत गुरुवारी महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकले. अंकिता भक्त हिने रौप्य पदकाची कमाई करीत दोघींनीही टोकियो आॅलिम्पिकचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे स्पर्धेची अंतिम फेरी भारतीय खेळाडूंमध्येच रंगली.उपखंडातील देशांसाठी ही पात्रता फेरी होती. त्यातून तीन जागांचा कोटा निश्चित होणार होता. राष्ट्रीय तिरंदाजी महासंघावर निलंबनाची तलवार असल्याने भारतीय खेळाडू राष्ट्रीय ध्वजाविना खेळत आहेत. त्यातही अव्वल मानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने शानदार कामगिरी केली.दीपिकाने मलेशियाची नूर अफीसा अब्दुल हिला ७-२ ने मागे टाकले. याशिवाय तिने इराणची जहरा नेमातीला ६-४, स्थानिक खेळाडू नरीसारा खुनहिरानचायो ला ६-२ असे मागे टाकून, उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले. यानंतर व्हिएतनामची एन्गुएट डोथिएनवर एकतर्फी लढतीत ६-२ असा विजय नोंदविला.अंकिताने हाँगकाँगची लाम शुक चिग एटाचा ७-१, व्हिएतनामच्या एन्गुएन फुयोंगचा ६-० आणि कझाखस्तानच्या अनास्तासिया बानोवा हिचा ६-४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत अंकिताने भूतानची कर्मावर ६-२ ने विजय मिळवला. अंतिम फेरीत मात्र ती दीपिकाकडून ०-६ अशी पराभूत झाली. भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा ठरला. याआधी तरुणदीप राय, अतानु दास व प्रवीण जाधव यांनी विश्व चॅम्पियनशिपमधून कोटा मिळविलेला. या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्य मिळवले. २०२० साली बर्लिन येथे होणाऱ्या विश्वचषकातूनही कोटा मिळविण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे. ‘आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या शोधात होतो. वेगवान वारे वाहत असल्याने सुरुवातीला नर्व्हस होते. मी मात्र श्वास रोखून स्वत:ला सावरत होते. माझा भावी पती अतानु दास याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची हमी दिली होती. ही स्पर्धा आमच्यासाठी लाभदायी ठरल्यामुळे संघात आनंदाचे वातावरण आहे.’- दीपिका कुमारी
आशियाई तिरंदाजी: दीपिका, अंकिता यांना ऑलिम्पिकचे तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 4:23 AM