वुहान : रियो आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्टÑकुल सुवर्ण विजेत्या सायना नेहवाल यांनी महिला एकेरीत अनुक्रमे चेन शियाओशिन आणि गाओ फांग्जी यांचा पराभव करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या एकेरीत के. श्रीकांत व एच. एस. प्रणॉयने अंतिम आठमध्ये जागा निश्चित केली.सायना नेहवालने ४० मिनिटे चाललेल्या लढतीत चीनच्या गाओ फांग्जीला सरळ दोन सेटमध्ये २१-१८, २१-८ गुणांनी पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा सामना कोरियाच्या बिगरमानांकित सुंग जी ह्युन व थायलंडची माजी विश्वविजेती रतचानोक इंतानोन या दोघींमधील विजेत्याविरुद्ध होईल. पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन शियाओशिनला २१-१२, २१-१५ गुणांनी नमवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.भारताचा स्टार शटलर के. श्रीकांतला पुरुषांच्या हॉँगकॉँगच्या वोंग विग की व्हिन्सेंटविरुद्ध कोणतेच कष्ट घ्यावे लागले नाही. व्हिन्सेंटने पहिल्याच गेममध्ये ७-२ अशी गुणस्थिती असताना माघार घेतली. उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश करणाऱ्या श्रीकांत आता तीन वेळा आॅलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या ली चोंग वेईविरुद्ध लढेल. अन्य लढतील भारताच्या एच. एस. प्रणॉयने पहिला गेम १६-२१ गुणांनी गमाविल्यानंतर दुसरा गेम २१-१४ आणि तिसरा गेम २१-१२ गुणांनी जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे बी. साईप्रणीतला आॅलिम्पिक विजेत्या चेन लोंगविरुद्ध १२-२१, १२-२१ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला.
आशियाई बॅडमिंटन: सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:02 AM