पुणे : ५२व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘मि. एशिया’ हा किताब पटकावला. तीनवेळचा ‘मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा रविवारी रात्री उशीरा संपली. या स्पर्धेत यजमान भारताने पुरूष शरीरसौष्ठव गटामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १५ पदके तर जिंकली, शिवाय या गटातील विजेतेपदही पटकावले.‘पत्नी स्वप्नाली हिने दिलेल्या पाठिंब्यामुळे आशियाई स्पर्धेत किताब पटकावणे शक्य झाले,’असे मुळचा मुंबईचा असलेल्या सुनीतने आवर्जुन नमूद केले. यंदाच्या या स्पर्धेत मिक्स्ड पेअर श्रेणीचा पुन्हा समावेश करण्यात आला होता. दिव्यांग ही नवी श्रेणीदेखील सुरु करण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रेमचंद डोग्रा, फेडरेशनचे सरचिटणीस आणि एशियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सहसचिव चेतन पठारे, अध्यक्ष आणि वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोटर््स फेडरेशनचे सरचिटणीस दतुक पॉल चुआ,इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष मधुकर तळवलकर आणि भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे सहसचिव सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते झाले.‘खूप परिश्रमानंतर मिळालेले हे विजेतेपद माझ्यासाठी संस्मरणीय आहे. आता माझा प्रयत्न भारतासाठी ‘मि.युनिव्हर्स’ हा किताब जिंकण्याचा असेल,’ असे सुनीत जाधव म्हणाला.
आशियाई शरीरसौष्ठव : सुनीत जाधव ठरला ‘मि. एशिया’, भारताला 15 पदकांसह विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 4:34 AM