बँकॉक : कविंदरसिंग बिश्त याने ५६ किलो गटात विश्वविजेत्या कैराट येरालियेवला नमवून आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत एक पदक निश्चित केले. ५२ किलो गटात अमित पांघल याने आॅलिम्पिक विजेता हसनबोय दुस्मातोव याच्यावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या ५७ किलो गटात सोनिया चहलही उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.बिश्तने गुणविभागणीद्वारे झालेल्या निर्णयात कझाखस्तानचा कैराटवर मात करीत आशियाई स्पर्धेचे पहिले पदक निश्चित केले. कैराटने मागच्यावर्षी याच स्पर्धेत कांस्य जिंकले होते. २०१५ साली येथे पदक जिंकणाऱ्या अमितने हसनबोयचा ३-२ असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही अमितने उझबेकिस्तानच्या या खेळाडूला नमवून सुवर्ण जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपची रौप्य विजेती सोनियाने कोरियाची सोन वा हिच्यावर विजय साजरा केला. ४९ किलो गटात अफगाणिस्तानच्या रामिश रहमानीकडून चाल मिळाल्याने दीपक सिंगने उपांत्य फेरीत कूच केली.विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लवलिना बोर्गेहेन हिला ६९ किलो गटात विश्व चॅम्पियन तायवानची चेन नियेन चीन हिने पराभवाची चव चाखवली. महिलांच्या अन्य एका लढतीत सीमा पुनियाला(८१ किलो) मात्र चीनची यांग शियोलीकडून ५-० ने पराभवाचा धक्का बसला. दिवसाच्या अखेरच्या लढतीत भारतीय खेळाडू रोहित टोकस याने ६४ किलो वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाचा शिजोरिंग बतारसुख याच्याविरुद्ध कडवी झुंज दिली. पण तो अखेर २-३ ने पराभूत झाला.
आशियाई बॉक्सिंग: कविंदरने विश्वविजेत्या कैराटला दिला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 3:14 AM