Asian Champions Trophy 2024 India vs China Final : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहाव्यांदा फायनल खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाला गोल डागता आला नव्हता. सलामीच्या सामन्यात ज्या चीनला भारताने सहज मात दिली तो संघ एका वेगळ्यात ढंगात खेळताना दिसला. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीला काही संधी निर्माण केल्या. पण चीनच्या गोलीनं सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करत भारताचे प्रयत्न अपयशी ठरवले. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत एकाही संघाला गोल नोंदवता आला नाही.
जुगराजनं गोल केला, अन् तमाम भारतीय चाहत्यांचा जीवात जीव आला
पण चौथ्या आणि अखेरच्या क्वॉर्टरमध्ये ड्रॅग फ्लिकर जुगराज सिंग याने भारताकडून पहिला गोल डागला. त्याच्या या गोलच्या जोरावर भारताने रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भारताने पाचव्यांदा आशियाई किंग होण्याचा पराक्रम करून दाखवला. चीनचा संघ पहिल्यांदाच फायनलपर्यंत पोहचला होता. घरच्या मैदानावर चीनच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली. पण शेवटी ते हतबल ठरले.
प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने मारली बाजी
पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकणारा आणि गत चॅम्पियन भारतीय संघ सुरुवातीपासूनच या स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता. घरच्या मैदानात खेळणाऱ्या चीन विरुद्धच्या लढतीनंच भारताने या स्पर्धेतील विजयी मोहिमेला सुरुवात केली होती. यजमान चीन शिवाय भारतीय संघाने जपान, मलेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांना पराभूत केले होते. साखळी फेरीनंतर उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाला दुसऱ्यांदा मात देत अपराजित राहत फायनल गाठली. एवढेच नाही तर फायनल बाजीही मारली.