ढाका : आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेमध्ये कोरियासोबतच्या सलामीच्या सामन्यात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिकच्या यशानंतर पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या भारताने या सामन्याची दणक्यात सुरुवात केली होती. चौथ्याच मिनिटाला ललित उपाध्यायने भारताचे गोलखाते उघडले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेत भारताला २-० ची भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत कोरियन संघाला गोल करण्यात अपयश आल्याने भारताची आघाडी कायम राहिली. मध्यांतरानंतर कोरियाने आक्रमणात धार आणत भारतीय गोलपोस्टवर हल्ले चढवले.
सामना ४१व्या मिनिटात गेला असताना कोरियाच्या जोगह्युन जैंगने गोल करत संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच ४६ मिनिटाला सुंगह्यून किमने पुन्हा एक भारतीय गोलजाळ्याचा वेध घेत कोरिया २-२ ची बरोबरी करून दिली. पाच मिनिटांच्या अवकाशात दोन गोल केल्याने कोरिया संघाच्या आत्मविश्वासात भर पडली. याचाच परिणाम असा झाला की, भारतीय बचाव फळी दबावात आली. याच दरम्यान भारतालाही गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र त्याच लाभ घेण्यात मनप्रीतचा संघ कमी पडला.
विशेष म्हणजे दोन पेनल्टी कॉर्नरही भारताने वाया घालवले. त्यामुळे अखेर हा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. कोरियन गोलकीपर जेईह्यून किमचा भक्कम बचाव हा सामन्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कारण भारतीय संघाच्या काही चांगल्या चाली त्याने हाणून पाडल्या. या स्पर्धेच्या मागच्या सत्रातही भारत आणि कोरिया सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता. भारताचा पुढचा सामना बुधवारी यजमान बांगलादेशविरुद्ध होणार आहे.