मुंबई - रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची सिमोन बिल्स, रशियाची मारिया पासेका आणि स्वित्झर्लंडच्या ज्युलिया स्टेंग्रूबर यांनी जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. पण, त्यांच्यापेक्षा प्रोदुनोव्हा प्रकाराच्या अंतिम लढतीत भारताच्या दिपा कर्माकरने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. दिपाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. पण, दिपाच्या त्या भरारीने संपूर्ण देशाला एक नवी ऊर्जा दिली.. नवी प्रेरणा दिली... नवा खेळ दिला... विशेष म्हणजे भारतीय मुलींसमोर तिने एक आदर्श ठेवला. दिपाच्या या यशस्वी भरारीनंतर भारतात जिम्नॅस्टिक्सचे वारे वाहू लागले.
2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपाच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर... शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले. कोणत्याही समारंभाला दिपा त्याच पूर्वीच्या साध्या वेशात आणि लाज-या स्वभावात दिसली. मात्र, दिपाने गुरूवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सर्वांना अचंबित केले आहे.