जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सर अमित पांघलने 49 किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिज स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकून भारताची पदकसंख्या 68वर नेली. आशियाई स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. स्क्वॉशमध्ये भारतीय महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पांघलने 49 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव करत भारताला 14 वे सुवर्ण जिंकून दिले.
त्यापाठोपाठ प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिज पुरुष दुहेरीत आणखी एक सुवर्ण जिंकून भारताला 15वे सुवर्णपदक जिंकून दिले. भारताने 2010च्या ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत एकूण 65 पदकं जिकंली होती आणि ती भारताची आशियाई स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. तो विक्रम आज मोडला.
जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 23 रौप्य आणि 29 कांस्यपदकांसह एकूण 67 पदकं नावावर केले आहेत. आशियाई स्पर्धेतील सर्वाधिक 15 सुवर्ण जिंकण्याच्या विक्रमाशीही भारताने यंदा बरोबरी केली. 1951च्या नवी दिल्ली आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक 15 पदकं जिंकली होती आणि जकार्तातही भारताच्या नावे 15 सुवर्णपदकं झाली आहेत.