जकार्ता : देशाला आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकवून देण्यासाठी त्याने कसलीच पर्वा केली नाही. शर्यतीपूर्वी त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते. त्याचबरोबर रक्तदाबही वाढला होता. खेळू नकोस, असं त्याला डॉक्टरांनी सांगितलंही होतं. पण देशाला पदक जिंकवून देईन, त्यानंतरच विश्रांती घेईन, असं तो म्हणाला. रोइंगमध्ये पुरूषांच्या लाइटवेट सिंगल स्कल्स या प्रकारात तो खेळायला उतरला. देशाला त्याने कांस्यपदक जिंकवून दिले, पण पदक घेण्यासाठी मात्र तो उभा राहू शकला नाही. कारण स्पर्धा संपल्यावर त्याला थेट स्ट्रेचरवर टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हा जिद्दी खेळाडू आहे भारताचा, आश्चर्य वाटलं ना. त्याचं नाव आहे दुष्यंत सिंग.
देशासाठी पदक जिंकण्यासाठी जिद्द घेऊन दूष्यंत स्पर्धेत उतरला आणि ७ मिनिटे १८ सेकंड च्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. अंतिम रेष पार केल्यावर तो कोसळला. पदक समारंभाच्या वेळी दुष्यंत मंचावर उभा सुद्धा राहू शकला नाही, त्याला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. 25 वर्षीय दुष्यंतने यापूर्वी २०१४ च्या इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक सुद्धा जिंकले होते.